Ad will apear here
Next
समाजसुधारणेचा ‘प्रयास’ करणारी संस्था
डॉ. अविनाश सावजी यांनी सुरू केलेली अमरावतीतील चांदूरबाजार येथील ‘प्रयास’ ही संस्था १९९४पासून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. बालवाडीत जाणाऱ्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांना ही संस्था मदत करते. तसेच नवे सामाजिक कार्यकर्ते घडवण्याचे मोलाचे कामही संस्था करते. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज पाहू या ‘प्रयास’ संस्थेबद्दल...
...........
आपल्या ज्ञानाचा उपयोग पैसा कमावण्यासाठी न करता समाजातील गरजू लोकांसाठी करण्याचा निर्धार केलेल्या डॉ. अविनाश सावजी यांनी १९९४मध्ये अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार या तालुक्याच्या गावी ‘प्रयास’ ही संस्था सुरू केली. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लहान मुले आणि युवकांकरिता आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. आज ही संस्था अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबवत आहे. बालवाडीत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांना मदत करण्याचे काम ‘प्रयास’ ही संस्था करते. तसेच, समाजासाठी काम करणारे नवीन कार्यकर्ते तयार करण्याचे कामही संस्था करत आहे.

सामाजिक प्रश्नांवरील संशोधन, त्यावर उपाय शोधण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणे आणि या प्रयोगातून सिद्ध झालेल्या उपायांचा प्रचार व प्रसार करून या प्रश्नांबाबत प्रबोधन करणे अशा विविध स्तरांवर ‘प्रयास’ ही संस्था काम करते. ‘प्रयास ही केवळ संस्था नसून, समाजासाठी चांगले काम करण्याची इच्छा असलेल्यांसाठी हा एक खुला मंच आहे,’ असे ‘प्रयास’चे संस्थापक डॉ. अविनाश सावजी म्हणतात.
 
शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, ‘कमवा व शिका’ योजनेतून काम मिळवून देऊन त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी प्रयत्न करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे अशी मदत संस्था करते. मुलांमधील सर्जनशीलता व संवेदनशीलता जोपासून त्यांना जबाबदार बनविण्यासाठी ‘प्रयास बालविहार’ हा खुला मंच संस्थेने सुरू केला आहे. याअंतर्गत शिबिरे, सहल, अभ्यासिका, संस्कार केंद्र, आनंददायी शिक्षण केंद्र, विज्ञान केंद्र, उन्हाळी शिबिरे आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. वाचनसंस्कार रुजविण्यासाठी ‘प्रयास साहित्य प्रबोधिनी’ उपक्रमातून सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध करून दिली जातात.

संस्थेच्या अमरावती येथील ‘सेवांकुर भवन’ या इमारतीत अत्यंत महत्त्वाच्या, पण तुलनेने दुर्लक्षित अशा विषयांवरील व्याख्याने, प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा संस्थेतर्फे नियमितपणे आयोजित करण्यात येतात. महाराष्ट्रातील अन्य ठिकाणच्या संस्था, संघटनांसाठीदेखील या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये आरोग्य, सुजाण पालकत्व, नातेसंबंध, परीक्षेतील यश, आयुष्यातील ध्येय ठरवणे असे विविध विषय हाताळले जातात.
यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा या जलाशयात साचलेला गाळ काढण्याचे काम संस्थेने स्वयंसेवकांच्या साह्याने केले. हा काढलेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला. संस्थेच्या या उपक्रमाची दखल सरकारने व माध्यमांनी घेतली. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा या कामाची दखल घेतली गेली.

अमरावती शहरातील अस्वच्छता दूर करणे, प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबत जनजागृती करणे व प्लास्टिक उत्पादनांची योग्य विल्हेवाट लावणे यासाठी संस्थेने ‘स्वच्छाग्रह’ हा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. त्याचे दुष्परिणामही सर्वांना जाणवू लागले आहेत. त्यामुळे चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार कसे टाळावेत, त्यासाठी आपल्या जीवनशैलीत काय बदल करणे आवश्यक आहे याची माहिती ‘हृदयसंवाद’ उपक्रमातून दिली जाते. ‘जीवनशैली क्लिनिक’मध्ये आहार, व्यायाम, योग, निसर्गोपचार या माध्यमांतून या बदलांचे प्रात्यक्षिक दिले जाते.

कुठलीही सामाजिक संस्था कार्यकर्त्यांच्या मदतीशिवाय आपले काम पुढे नेऊ शकत नाही. त्यामुळे सामाजिक कामाबरोबरच हे काम करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींना घडवण्याचे कामही तितकेच महत्त्वाचे. हे काम संस्था ‘सेवांकुर शिबिर’ व ‘सेवांकुर फेलोशिप’ या कार्यक्रमांच्या माध्यमातून करत आहे. समाजासाठी काही करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांमधील सामाजिक संवेदनशीलता वाढवून सामाजिक काम करण्यासाठी सुरुवातीला लागणारा आधार देण्याचे काम संस्थेकडून केले जाते. महाराष्ट्रात आतापर्यंत २१ ठिकाणी संस्थेने सेवांकुर निवासी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरातून प्रेरणा घेऊन सुमारे पन्नास जणांनी सामाजिक कार्याची करिअर म्हणून निवड केली आहे.
 
भविष्यकालीन योजना :
माणसाच्या आयुष्यात कोणत्याही कारणाने आलेली नकारात्मकता, नैराश्य दूर करण्यासाठी सुसंवाद हा उपाय प्रभावी ठरतो. म्हणून अशा व्यक्तींसाठी संस्था ‘प्रयास हेल्पलाइन’ सुरू करणार आहे. प्रशिक्षित स्वयंसेवक व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यासाठीचे काम सुरू आहे.
कॅन्सर व त्यासारख्या अन्य दुर्धर आजारांशी हिमतीने लढणाऱ्या व इतरांनाही प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. जुन्या वर्तमानपत्रांच्या रद्दीचे संकलन व देणगीदारांच्या मदतीतून हा निधी उभारण्यात येणार आहे.
या सर्व कामांसाठी संस्था कोणतीही सरकारी मदत घेत नाही. वैयक्तिक देणगीदारांनी केलेल्या मदतीवरच संस्थेचे काम चालते. संस्थेच्या कामाचा व्याप मोठा आहे आणि भविष्यात महाराष्ट्रात अन्य ठिकाणी कामाचा विस्तार करण्याची संस्थेची योजना आहे. त्यासाठी संस्थेला देणाऱ्या हातांची गरज आहे. संस्थेच्या कार्याला शुभेच्छा...!

संपर्क : प्रयास संस्था, चांदूरबाजार, अमरावती
फोन : (०७२१) २५७३२५६, ९४२०७ २२१०७, ८२७५३ २९५५३
ई-मेल : sevankur@gmail.com, aksaoji@gmail.com
वेबसाइट : www.prayas-sevankur.org

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZSHBH
 Sachine Joshi is innovater of experimental school his chemistry for experimental school is successful and his gineous ideas will be the milestone for new generation
We are that he is our friend
Definitely espalier school will be corncomb of Nashik
I wish all bright future to espalier organisation
Abhinao Godase
 Dhushkari santha
Similar Posts
समस्येला उत्तर देणारं ‘प्रश्नचिन्ह’ गुन्हेगारी, अज्ञान आणि गरिबी यांच्या गर्तेत फसलेल्या फासेपारधी समाजातील मुलांच्या अंधकारमय स्थितीने अस्वस्थ झालेल्या याच समाजातील मतीन भोसले या संवेदनशील, सुशिक्षित तरुणाने या समाजातील मुलांचे भविष्य बदलण्यासाठी अमरावतीत मंगरूळचव्हाळा येथे ‘प्रश्नचिन्ह’ नावाची संस्था उभारली आहे. त्यामुळे भीक मागून किंवा
‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था मूल मतिमंद असले, तरी त्याच्यातही काही सुप्त गुण असतातच. मतिमंदत्वामुळे ‘निरुपयोगी’ असा शिक्का मारून अशा मुलांना दूर न ढकलता त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेणे, त्यांचा विकास करणे आणि त्यातूनच त्यांचे नवे आत्मनिर्भर व्यक्तिमत्त्व तयार करणे हे ध्येय उराशी बाळगून रत्नागिरीतील ‘आविष्कार’ संस्थेने
बळीराजाला बळ देणारी संस्था आज बलिप्रतिपदा आहे. त्या निमित्ताने ‘लेणे समाजाचे’ सदरात माहिती घेऊ या यवतमाळमधील दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाच्या कार्याबद्दल. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी आधार देण्यापासून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नयेत यासाठीदेखील ही संस्था काम करते.
आता शेतीही होतेय ‘स्मार्ट’ अमरावती : अमरावती येथील ‘राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट’च्या विद्यार्थ्यांनी पिकांचा दर्जा सुधारण्यासाठी व शेतकऱ्यांचे नुकसान कमी व्हावे याकरिता एका ड्रोनची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या प्रकल्पाची निवड राष्ट्रीय स्तरावरील ‘ई-यंत्रा’ या स्पर्धेसाठी करण्यात आली होती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language